१४ जानेवारी, १७६१
" जरीपटक्याचा हत्ती इकडेतिकडे चीत्कारत उधळू लागला. सूर्य अस्ताकडे चाललेला. जरीपटक्याचा नेहमीचा हसरा फरारा आता मलूल दिसत होत. त्याच्या रक्षणासठी उरलेसुरले मराठे प्राणाची बाजी लावू लागले, भोवतीने झोंबू लागले. "
" जरीपटक्याजवळ दाटी झाली होती. डोळ्यांदेखत गिलचे मराठ्यांच्या मानाचे पान नेणार, ह्याचे वैषम्य उरल्यासुरल्या स्वारांना वाटले. त्यांनी हत्तीवरचा जरीपटका खाली घेतला, घोड्यावर घातला. गिलचे हटेनात, निशाणाची पाठ सोडेनात, तसे स्वारांनी निशाण गुंडाळले. ते घेऊन स्वार बाजूला पळू लागले. भाऊंची जिद्द, धमक आणि हिंमत अजून बुझली नव्हती, बुझणार नव्हती. रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत रण लढावयाचा त्यांचा निर्धार पक्का होता."
" जनकोजीचा चुलता तुकोजी शिंदे घोडी उडवीत भाऊंना भिडला. कळवळून बोलला, "भाऊS, क्षात्रधर्माची शर्थ झाली! महाराष्ट्र लोकी आपल्यासारखा कोणी मायेच पूत अस झुंजला-झगडला नाही. याउपर आपण निघाल तर उत्तम आहे."
भाऊसाहेब विषण्ण मनाने हसले. गदगदल्या शब्दांत म्हणाले, "अरे तुकोबा, आता कोणीकडे जावे? रावसाहेबांची काय गत झाली? याउपर पुण्यास काय म्हणून तोंड दाखवावे? ह्या कवडीमोलाच्या साडेचार हात देहाची क्षिती ती काय बाळगावी? याउपरी इथेच लढावे, लढता लढता मरावे, मरुनी घडावे."
हजारो गिलच्यांची सभोवती दाटी झाली होती, तरी गिलच्यांत घुसून भाऊ एकसारखे झुंजत होते. इतक्यात गिलच्यांनी चार-पाच फैरी झाडल्या. त्य भाऊंच्या अंगाखालच्या घोड्याच्या छाताडात घुसल्या. घोडा रक्ताच्या गुळण्या टाकीत खाली कोसळला. किती तरी वेळ एकाकी भाऊ झुंजत, झगडत होते. धुराने, धगीने, घामारक्ताने त्यांचे सर्वांग माखले होते. हे भाऊ की अन्य कोणी हे ओळखू येत नव्हते. म्रुत्यूचा मुका घेण्यासाठी भाऊसाहेब आसुसले होते; पण म्रुत्यूच आपले काळे तोंड लपवीत त्यांना चोरासारख्या हुलकावण्या देत होता. भाऊंनी बाजूस पाहिले. ३०-४० खंदा मराठा सोडला तर भाऊसाहेबांना आपले कोणी दिसेना. कलाबुताच्या गोंड्यांनी गुंफलेल्या भरजरी झालरा घातलेली घोडी नाहीत की गेंद भरलेले हत्ती नाहीत. अंबाऱ्या नाहीत, हौदेही नाहीत. ना पालख्या, ना आबदागिऱ्या! सभोवती काळेनिळे, धुरकटलेले खिन्न आभाळ, रक्ताचे असंख्य पाट वाहिल्याने काळजाचा थरकाप उडालेली धरती, कोंदट अंगात धुंदफुंद कापरे भरलेली हवा, भयभीत आसमंत. सूर्य अस्ताला चाललेला, त्याची दोन चोरटी किरणे, धुराधगीच्या गर्दीतून भाऊंचे दर्शन घेण्यासाठी पालथी पडलेली.
एकाएकी भाऊंना कोठल्या तरी स्वाराचे एक भीमथडी तट्टू बाजूला उभे असलेले दिसले. तेही रक्तात न्हालेले. खासा भाऊ पुढे धावला. भाऊंनी तिसऱ्यांद मांड ठोकली, हातात तलवार-भाला घेऊन भाऊ झुंजू लागला. पण, जंबुऱ्याचा एक तडाखा भाऊंच्या मांडीवर बसला. आगीच्या ठिणग्या आणि मांसाचे तुकडे बाजूला उडाले. पाठोपाठ त्याच मांडीवर जमदाड्याचा तडाखा बसला, जखमा जिव्हारी लागल्या. उभ्या देहाचा लोळागोळा करणाऱ्या कळा येऊ लागल्या, असह्य वेदनेने भाऊसाहेब घोड्यावरून बाजूला कोसळाले, "हेS भवानी, श्रीमंतSS श्रीमंतSS" असा शब्दोच्चार करीत भाऊ रक्ताच्या थरोळ्यात पडले.
अजून भाऊंच्या उरातली जिद्द, रग, धग मावळली नव्हती. डाव्या हातातल्या भाल्यांचा काठीसारखा उपयोग करीत आणि दुसऱ्या हाताने असह्य कळा-वेदना दाबत भाऊसाहेब तसेच उठले. स्वप्नातून उठल्यासारखे! डोळ्यांत रक्त साकळलेले. भाऊंच्या पुढ्यातच चार हातांवर पाच गिलचे हातात फरश, कुऱ्हाडी, भाले घेऊन दैत्यासारखे खडे होते. पाच गिलचे हातातल्या शस्त्रानिशी पुढे आले. तोच अंगातले उरलेसुरले बळ एकवटून भाऊंनी एका हाताने भाला उंचावला. रक्त-अश्रूंनी डबडबलेल्या त्यांच्या डोळ्यांनी गिलच्यांच वेध घेतला, असंख्य कळा-वेदना दाबत भाल्याचे सपासप चार वार केले. एकापाठोपाठ एक असे चार गिलचे उलथे-दुणते होत खाली कोसळले. अतिश्रमाने दमलेल्या भाऊंच्या डोळ्यांवर अंधारी आली. पाचव्याच्या समाचारासाठी त्यांनी जिवाच्या जोराने भाला उंचावला. तोच स्वर्ग आणि प्रुथ्वीच्या सीमारेषेवर मघापासून अडखळलेल्या भाऊंचे प्राणपाखरू भुर्रकन उडून गेले. हातातला भाला तसाच खाली गळून पडला. तालीमबाजीचा बळकत, चिवट देह, जिद्दी जिवाला सोडून बाजूला मुडद्यांच्या राशीत कोसळला. बहाद्दर सोबत्यांच्या मुडाद्यांत मुडदा मिसळला.
त्याच दिवशी, त्याच वखताला महाराष्ट्र देशी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत होता. घराघरांत, तव्यातव्यांवर पुरणपोळ्या चर्रचर्रत होत्या. तेव्हा कळीकाळाशी झोंबी घेता घेता चिमाजीअप्पांचा सदशिवभाऊ नावाचा ऐन तिशीतला वेडा पोर दूर पानिपताच्या अटिंग्या रानी चिरनिद्रा घेत होता.
" आज अख्खा हिंदुस्थान माझ्या मुठीत आला आहे; पण ह्या घडीला त्या काफरांच्या पराक्रमाच्या कथासुद्धा विसरून चालणार नाहीत. इतक्या दिवसांचे उपाशी असून, दुष्काळाच्या तडाख्यात एवढे होरपळूनसुद्धा सारे पठ्ठे जान कुर्बान करून लढले. पोटाच्या गाण्याने हैराण झालेली, उपाशी, कंगाल अशी घोडी, माणसे जगाच्या इतिहासात क्वचितच लढली असतील. शहावलीS, अगदी दिलातली बात बोलायची तर आपल्या पुराणकाळातील रुस्तुम आणि इस्फिंदारसारखे महायोद्धे आजच्या रणावर हजर असते तर त्या काफरांचा महान पराक्रम पाहून त्यांनीही अवाक होऊन तोंडात बोटे घालून कराकरा चावली असती.", दुराणी बादशाह मसलतीतून निघून गेला.
-- पानिपत, विश्वास पाटील
इतिहासातून आपण तसेही कधी काही शिकत नाहीच, किमान त्या इतिहास घडावणाऱ्या पराक्रमाच्या गोष्टी त्या त्या दिवशी आठवून तरी बघाव्यात, म्हणून..... मराठी संक्रांत वाईट का समजली जाते? संक्रांत कोसळते हा वाक्प्रचार कसा आला? मराठी माणसाच्या पराक्रमाचे उत्तुंग टोक आणि पानिपताच्या दारूण पराभवामुळे मराठी माणसाची कच खाण्याची व्रुत्ती ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवसाच्या घटनेशी निगडीत आहेत का? असे काही प्रश्न (उत्तरे).. इतिहासातून शिकणाऱ्यांसाठी.....