Sunday, October 6, 2013

कविता Personified

तू नव्हतीस तोवर,
लिहायचो काहीतरी,
जाणवायचा तो फक्त
भावनांचा गोंधळ....

पण एक दिवस तुला पाहिलं..
कविता अशी अंगा-खांद्यावर खेळवताना
वाटलं पकडावं तिला कागदात
बांधून ठेवावं काळ्या शाईत
ऐनवेळी उपयोगी येईल

पण ती एकदम खट्याळ
रात्री उशाशी येऊन बसली
डोळ्यातली झोप काढून त्या जागी
अशक्य पण सुंदर स्वप्नं भरत
नजरेच्या रस्त्याने काळजात हात घालते
२-४ ठोके अडवून धरते
जीव घाबरला की हसत सोडून देते
वैतागून धावलो तिच्या मागे
ती ही धावत होतीच,
प्रतिभेला वाकुल्या दाखवत,
कुठे कुठे गोल गोल फिरवलं, दमवलं,
मग हसत राहिली माझी फजिती पाहत, 

एकदा खेचलचं तिला कागदावर
बावरली, घाबरली ती
अाणि पूर्वीसारखी जाणवलीच नाही,
अगदी कोमेजून गेली
खूप प्रयत्न केला, पण
गिरवायला जमलीच नाही

मग दिलं सोडून...
असू देत तुझ्याकडेच तिला...
तुझ्यावरच छान खुलते ती
अाणि तुझ्याच बरोबर 
छान मिरवून घेते स्वत:ला
जप तिला..अाणि सांग
वहीत तिची जागा
राखून ठेवली अाहे
मोरपिसाशेजारी,
कधीतरी ये अापणहून
तिथे रहायला

No comments: