Tuesday, June 4, 2013

शब्द

वेळ ना काळ
कधीही, कुठेही सुचतात..
नव्हे सुचल्यासारखं करतात...
पेन शोधेस्तोवर
पळून जातात...
तू समोर आलीस की
पळतात ना...
तसेच...
मी आपला कावराबावरा होऊन
शोधत असतो त्यांना
हरवून जातो कुठे तरी
तुझ्या डोळ्यांत हरवतो
तसाच..
तू विचार करतेस...
"हा असा गप्पं का एवढा?"
माझा नेहमीचाच गोंधळ
बोलायला शब्द शोधू?
की तुझ्या डोळ्यातून वाट?

-------------------------------

फार शेफारले आहेत आता ते...
तुझं कौतुक करताना
शब्दांचे जे लाड केलेत...
की आता सुचतच नाहीत...
कुठल्याही अलंकारात ते आता
स्वत:ला सामावून घेत नाहीत
कुठल्याही व्रुत्ताचे, छंदाचे नियम
पाळत नाहीत..
वयात आलेल्या मुलांसारखं
मोकाट हुंदडत असतात...
घालतात मनामध्ये दंगा
त्या उनाड उर्मीतून निपजलचं काही
तर उतरवुन घेईन कागदावर....
तोवर माझ्याकडे
देण्यासारखं काहीच नाही...

------------------------------------

तू मात्र आता शब्द जपुन वापर...
त्यांची कविता करण्यची किमया
तुझ्या आवाजात आहे...
तू लाख बोलशील गं...
पण माझ्या लेखणीला मर्यादा आहेत...

----------------------------------------

No comments: